लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग – राज्यात काही जण सध्या जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत आहेत. प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. पण कुणाच्या तोंडात घातलेला घास काढून घेणे ही आपली संस्कृती नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता लगावला. ते रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे पाणी पुरवठा योजना आणि समुद्र किनारासुशोभिकरण योजनेच्या लोकार्पण समारंभाच्या निमित्ताने आयोजित सभेत बोलत होते.
मराठा समजाला आरक्षण मिळाले पाहिजे यात दुमत नाही. पण एका समाजाला आरक्षण देतांना, दुसऱ्याचे काढून दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही जण आरक्षणासाठी वेळ द्यायला तयार नाहीत. आम्ही मुंबईला येऊ म्हणतात. तरुणांची माथी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे. आंदोलन जरूर करा पण कायदा हातात घेऊ नका असे आवाहन मराठा समाजातील तरुणांना पवार यांनी केले.
आणखी वाचा-चार राज्यांच्या निवडणूक निकालांबाबत अजित पवार यांनी काय दिली प्रतिक्रीया? जाणून घ्या…
यापूर्वी दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण दिले गेले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळत दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नव्हते. यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत आम्ही काही निर्णय घेतला तरी न्यायलयात सर्व कसोट्यांवर टिकला पाहीजे ही राज्यसरकारची भूमिका आहे. त्यानुसार पाऊले टाकली जात आहेत. या प्रक्रीयेला लागणाला वेळ द्यावा लागेल असेही पवार यांनी स्पष्ट केले.