संजीव कुळकर्णी, नांदेड
अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’ने नांदेडसह महाराष्ट्रातील पाच विमानतळे भाडेतत्त्वावर घेतली, पण या कंपनीने सर्वच विमानतळांची वाट लावली असून त्यावर काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले.
रविवारी सकाळच्या सत्रात नांदेडमधील बाजारपेठा गजबजलेल्या असताना विमानतळाच्या परिसरात मात्र खाकी आणि खादीची मांदियाळी जमली होती. निमित्त होते, आजी-माजी मुख्यमंत्री तसेच दोन विद्यमान उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त स्वागताचे आणि बंदोबस्ताचे. या चौघांतील अजित पवार यांचे विशेष विमान सर्वप्रथम नांदेड विमानतळावर उतरल्यानंतर पवार यांनी तेथील ‘व्हीआयपी’ कक्षात स्थानिक लोकप्रतिनिधींशी वेगवेगळय़ा विषयांवर चर्चा केली. तत्पूर्वी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी धावपट्टीवर पवारांचे स्वागत केले. नंतर चिखलीकरांची कन्या प्रणिता आणि पुत्र प्रवीण यांनीही अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर खासदार चिखलीकर यांच्याशी बोलत-बोलतच पवार विमानतळाच्या इमारतीत दाखल झाले. यावेळच्या चर्चेत नियमित विमानसेवा तसेच विमानतळाच्या दुर्दशेचा विषय निघाल्यानंतर पवार यांनी त्यास अनिल अंबानी यांच्या कंपनीस जबाबदार धरले. या कंपनीने नांदेडसह यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद आणि बारामती येथील विमानतळे भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतली, पण आज या सर्वच विमानतळांची दुर्दशा झाली असल्याचे त्यांनी मान्य केले. या विषयावर मुंबईला गेल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची ग्वाही पवार यांनी नंतर दिली.
हेही वाचा >>>मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
अजित पवार यांच्या आगमनानंतर सुमारे अध्र्या तासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे शासकीय विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झाले. स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले.