शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पुढे राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकरला. त्यानंतर काही महिन्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र राज्याच्या सध्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नाही. तसेच मागील सात महिन्यांपासून राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही रखडलेला आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ९ महिन्यांत बाळ जन्माला येते. मात्र ७ महिने झाले तरी यांना मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. ते आज (११ फेब्रुवारी) एका सभेला संबोधित करत होते.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“त्यांना (भाजपा, शिंदे गट) महिलांची मतं पाहिजेत. पण सात महिने झाले एकाही महिला भगिनीला त्यांनी मंत्रिमंडळात घेतलेले नाही. महिला कर्तृत्ववान नाहीत का? मंत्रिमंडळात सगळे २० पुरष भरले आहेत. मंत्रिमंडळात २-४ महिलांचा समावेश केला असता, तर बिघडलं असतं का?” असा सवाल अजित पवार यांनी केला.
९ महिन्यांत तर बाळ जन्माला येतं
“लवकरच मंत्रिमंडळात महिलांचा समावेश करू असे ते सांगतात. मग ते प्रत्यक्षात कधी होणार. ७ महिने झाले त्यांना साधा मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही. ९ महिन्यांत तर बाळ जन्माला येतं. यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाहीये,” अशी खोचक टीकाही पवार यांनी केली.
मुलं होण्याचा आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा काय संबंध
दरम्यान, अजित पवार यांच्या या टीकेवर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. “मुलं होण्याचा आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा काय संबंध. याबाबत अजित पवार यांनाच माहिती असेल. त्यांना फक्त बोलता येतं. त्यांनी मंत्री असताना काय केले, याची चौकशी सुरू आहे,” अशा टोला नारायण राणे यांनी लगावला.