राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी (१३ जून) एक जाहिरात देण्यात आली होती. ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला होता. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाकडून ‘देशात नरेंद्र अन् महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा दिली जात होती. परंतु काल प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देण्यात आलेल्या जाहिरातीवर ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर छापण्यात आला होता. या जाहिरातीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. ही जाहिरात शिवसेनेच्या शिंदे गटाने दिली असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी (शिंदे गट) काहीही संबंध नाही, असा दावा शिंदे गटातील मंत्र्याने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ती जाहिरात दिली असावी, असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. तर काहींना असं वाटत होतं की, ही जाहिरात राज्य सरकारने दिली असावी. यावर चर्चा सुरू असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली.

यावर आज पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारही बोलले. अजित पवार म्हणाले, मी काही अधिकाऱ्यांना विचारलं तुम्ही दिलीय का ही जाहिरात? तर त्यावर ते म्हणाले आमचा या जाहिरातीशी काहीही संबंध नाही. त्यांनी पक्षाच्या पातळीवर हे केलंय. आमचा (राज्य सरकारचा) या जाहिरातीशी दुरान्वये संबंध नाही. शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शिंदे गटातील नऊ मंत्र्यांचे फोटो आहेत. यावरून अजित पवार म्हणाले, अशी जाहिरात मी याआधी कधीच पाहिली नाही. यातून केवळ त्या नऊ जणांचा उदो उदो करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापैकी पाच वादग्रस्त मंत्री आहेत.

अजित पवार म्हणाले, जाहिरातीत खाली नऊ मंत्र्यांच्या फोटोंची माळ लावली आहे. मग भाजपाच्या मंत्र्यांचे फोटो का नाही टाकले? त्या नऊपैकी पाच मंत्र्यांबद्दल सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, राजकीय पक्षाचे लोक किंवा माध्यमं प्रश्न उपस्थित करत आहेत. ते वादग्रस्त मंत्री आहेत. या वादग्रस्त मंत्र्यांविषयी दोन दिवसांपासून माध्यमांवर सातत्याने बातम्या येत आहेत. परंतु हे सरकार त्या वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का? असा संतप्त प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticizes eknath shinde group for 2 consecutive advertisements asc