एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. ही मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या या आंदोलनासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलेल्या विधानाचीही तेवढी चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निवडणूक आयोग असा उल्लेख केला. अनावधानाने केलेल्या या विधानाचा आधार घेत विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली. दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावर भाष्य केले आहे. ते आज (२६ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भास्कर जाधव यांची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “मुलं गेल्यावर दिघेंनी दुःखातून बाहेर काढलं आणि तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला…”

“तरुण-तरुणींच्या मनात नैराश्याची स्थिती निर्माण झाली आहे. ते आता गुन्हेगारीकडे वळत आहेत. ७५ हजार नोकरभरतीची घोषणा करण्यात आली. हा फक्त जुमला होता. बाकी काहीच नाही. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्यांसाठी दोन वेळा उपोषण करावे लागले. आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे. २०२५ सालापर्यंत आम्ही नवा अभ्यासक्रम लागू करणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर दोन महिने काहीच झाले नाही. याच कारणामुळे विद्यार्थी पुन्हा उपोषणाला बसले. पुढे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर एमपीएससीने आदेश कढला,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये! अजित पवार संतापले; म्हणाले “चहात काय…”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एमपीएससीला आम्ही विनंती केली आहे, असे सांगण्याऐवजी फक्त निवडणूक आयोग, निवडणूक आयोग हेच सांगत बसले. मी खरं सांगायला गेलो की ते माझ्यावरच चिडतात. अजित पवार असे बोलले, अजित पवार तसे बोलले असे म्हणतात. अरे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलले, म्हणूनच मीही म्हणालो. कुठे चूक झाली तर ती आम्ही दाखवणारच. आमचे ते कामच आहे,” अशी खोचक टिप्पणी अजित पवार यांनी केली.

हेही वाचा >>> “सोनिया गांधी राजकारणातून…”, संन्यास घेण्याच्या वृत्तावर काँग्रेस प्रवक्त्याचं मोठं विधान

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलत असताना लोकसेवा आयोग बोलण्याची ऐवजी निवडणूक आयोग असे बोलून गेले. त्यामुळे शिंदेंना नक्की काय म्हणायचे होते? असा प्रश्न निर्माण झाला होता. याच विधानाचा आधार घेत नंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलीच टीका केली होती. पुढे माझ्याकडून ही चूक अनावधानाने झाल्याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticizes eknath shinde tongue slip on mpsc students protest demands prd