राज्यातल्या नव्या सरकारने म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारने आज त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधीमंडळाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता, पवार म्हणाले की, “हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकारचा चुनावी जुमला आहे.”
अजित पवार म्हणाले की, “अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आपण पाहिला. खरंतर हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकराचा चुनावी जुमला आहे. यात आपल्याला दूरदृष्टीचा आभाव जाणवेल. तसेच वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे. या राज्यात अलिकडच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ९ वेळा आणि मी स्वतः ७ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. माझ्या मते स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे.”
हे ही वाचा >> आता मोबाईलद्वारे होणार पंचनामा! नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार
निवडणुकीआधी केलेल्या घोषणांचं काय झालं?; अजित पवारांचा सवाल
आपल्या राज्याची परिस्थिती काय आहे. राज्याचं उत्पन्न किती, खर्च किती याचा कोणताही विचार सरकारने केलेला दिसत नाही. वीज, गॅस, पाणीपुरवठा, बांधकाम क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्प सादर करताना सरकारने लोकांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत फिरवण्याचं काम केलं आहे. निवडणुकीआधी केलेल्या घोषणांचं काय झालं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पात विकासकामांना कोणताही नवीन निधी देण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे.