कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्र्रातील विरोधक सत्ताधारी शिंदे गट-भाजपावर टीका करत आहेत. असे असतानाच चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा बेळगावचा नियोजित दौराही लांबणीवर टाकण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली आहे. याच मुद्द्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ‘अरे ला कारे’ ने उत्तर द्यावे. केंद्र सरकारकडे तक्रार करून काहीही होणार नाही. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार काहीही कारणे देत आहे, अशा शब्दांत टीका केली. ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा! सरकार शिवरायांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखंही महाराष्ट्रात आणणार
“तक्रार काय करता? त्यांच्या अरे ला कारे ने उत्तर द्या ना. महाराष्ट्राची ताठर भूमिका दिसली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्यं करत आहेत त्या वक्तव्यांना जशास तसे उत्तर देण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >>> “लवकरच इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करू”, देवेंद्र फडणवीसांचे चैत्यभूमीवरून आश्वासन
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर रोजी झालेले आहे, हे अख्ख्या भारताला वर्षानुवर्षे माहिती आहे. त्यामुळे बेळगावच्या दौऱ्याची तारीख निवडताना ६ डिसेंबर रोजी काय आहेयाबाबत कल्पना नव्हती का. त्यांनी बेळगाव दौऱ्याची पुढची तारीख सांगावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगत आहेत की आम्ही महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावमध्ये येऊ देणार नाही. आता ज्या राज्यांत हे दोघे निघालेले आहेत, त्या राज्याचे मुख्यमंत्रीच त्यांना येऊ देत नाहीयेत. महाराष्ट्राच्या सरकारचे हे अपयश आहे. आपले अपयश झाकण्यासाठी हे थातूरमातूर कारणं देत आहेत,” असेही अजित पवार म्हणाले.
मंत्र्यांचा बेळगाव दौरा पुढे ढकलला?
हेही वाचा >>> राज ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, म्हणाले “डॉ. आंबेडकर सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग…”
चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे दोन मंत्री ६ डिसेंबर रोजी बेळगावात महापरीनिर्वाणदिनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई या दौऱ्यासाठी पुढील तारीख ठरवणार आहेत.