Ajit Pawar on Sharad Pawar News Maharshtra Assembly Elections 2024 : नव्या अन् तरुण उमेदवारांना संधी द्यायला हवी असं शरद पवार म्हणाले होते. बारामती विधानसभा मतदारसंघात आता तरुण नेतृत्त्वाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. बारामती विधानसभा मतदारसंघामुळे काका पुतणे सातत्याने चर्चेत असतात. यावरून अजित पवारांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. ते बोल भिडूने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
“३० वर्षे मला साथ दिलीत, ३० वर्षे अजित पवारांना साथ दिलीत आणि पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले होते. यावर अजित पवार म्हणाले, “त्यांची ३० वर्ष झाली. आता ते म्हणतात की मी कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नाही. ते माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. ते ८५ वर्षांचे आहेत आणि ते मला आता रिटायर करायला निघालेत. ते मात्र ८५ वर्षांपर्यंत काम करू शकतात, हा कोणता न्याय?”, असं अजित पवार म्हणाले.
सदाभाऊ खोतांशी कसं जुळवून घेता?
“ही महायुती आहे. महाविकास आघाडी, महायुतीमध्ये अनेक राजकीय पक्ष घटकपक्ष म्हणून येतात. त्यावेळी तुम्हाला दुजाभाव करून चालत नाही. सदाभाऊ खोतांनी केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, परंपरा नाही. मतभेद असले तरीही कंबरेखालचे वार करत नाहीत. व्यक्तीच्या आजारावरून टीका टिप्पणी करत नाहीत. राजकारण दोन दिवसांचं असतं, त्यातून आपण काय मिळवतो?” असं अजित पवार म्हणाले.
नव्या कार्यकर्त्यांनाही संधी दिली पाहिजे
“शरद पवारांनी काही जुन्या नव्यांना घेऊन काम केलं आहे. मीही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. असं करावंच लागतं. कारण नवे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. त्यांच्यात स्पार्क आहेत की नाही हेही पाहावं लागतं”, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >> माझ्यासाठी, सुप्रियासाठी शरद पवार कधी उमेदवारी अर्ज भरायला आले नाहीत, मग युगेंद्रसाठी कसे गेले?
मला पाडण्याकरता प्रतिभाकाकी प्रचाराच्या मैदानात
“मला आईसमान असलेल्या आमच्या प्रतिभाकाकी गेल्या ४० वर्षांपासून घरोघरी जाऊन प्रचार करत नव्हत्या. परंतु, त्या आता घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. अजितला पाडण्याकरता जात आहेत का?” असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “आम्हा सर्व मुलांमध्ये मीच काकींच्या सर्वाधिक जवळ राहिलेलो आहे. त्यामुळे मी भेटल्यानंतर त्यांना याबाबत विचारणार आहे. सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीला, माझ्या निवडणुकीला त्या एवढ्या फिरल्या नाहीत. १९९० पर्यंत त्या शरद पवारांच्या प्रचारसभेला जायच्या. परंतु, त्यानंतर त्यांनी प्रचार केलेला नाही. फक्त निवडणुकीच्या शेवटच्या सभेला त्या यायच्या. बाकी कधी यायच्या नाहीत.”