जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सहा महिन्यांत कमी करणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करण्यास तयार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दिल्लीकरांनी निवडून दिल्यानंतरही सत्ता स्थापन करण्याची आपची तयारी नाही, हे त्याचेच द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.  महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी येथे दाखल झालेल्या पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर मतप्रदर्शन केले. आपने ज्या मुद्दय़ांवर निवडणूक लढविली, त्या मुद्दय़ांशी त्यांनी प्रामाणिक राहिले पाहिजे. निकालानंतर त्यांनी सत्ता स्थापन करणे अपेक्षित आहे. त्रिशंकू स्थिती असली तरी सत्ता मिळविता येते, काम करता येते; परंतु ज्या मुद्दय़ांवर आपने ही निवडणूक लढविली, त्यावर लगेचच काही तोडगा काढता येणे शक्य नसल्याचे अरविंद केजरीवाल यांना ठाऊक असावे. त्यामुळे आप सत्ता स्थापन करण्यात तयार नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.
 महाराष्ट्रात जैतापूर असो की दाभोळ प्रकल्प असो, मोठय़ा प्रकल्पांना विरोध केला जातो. अशा प्रकल्पांना शेतकऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. वारंवार असे घडले तर राज्यात मोठे प्रकल्प कसे येणार, असा प्रश्नही त्यांनी केला.
दोंडाईचा औष्णिक वीज प्रकल्पाच्या जागेचा तिढा सुटला असला तरी आता कोळशाची उपलब्धता होत नसल्याने तो रखडला आहे. हा पेच सुटल्यानंतर या प्रकल्पाचा मार्ग मोकळा होईल, असे ते म्हणाले. धुळे महापालिका निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार हा निर्णय झाला असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Story img Loader