Devendra Fadnavis Speech at Raigad : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज (१२ एप्रिल) रायगडावर मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात सर्वप्रथम खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषण केलं. त्यानंतर सूत्रसंचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, फडणवीस यांनी सूत्रसंचालकांना थांबवलं आणि सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील. त्यानंतर सूत्रसंचालकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी या भाषणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुकही केलं. त्यांनी यावेळी कुठलीही राजकीय टिप्पणी केली नाही.

रायगडावर नेमकं काय घडलं?

शिंदेंपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आणि शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण झालं. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अजित पवारांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अजित पवारांना डाववेलं नाही. या कार्यक्रमाच्या नियोजनानुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणार नव्हती. मात्र ऐनवेळी फडणवीसांनी शिंदेंना आपल्या आधी भाषण करण्याची संधी दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं भाषण होऊ शकलं.

दरम्यान, फडणवीसांनी केवळ एकनाथ शिंदेंनाच संधी दिली, अजित पवारांना संधी दिली नाही, त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

फडणवीसांनी मान्य केल्या उदयनराजेंच्या मागण्या

या कार्यक्रमावेळी उदयनराजे भोसले यांनी पाच मागण्या मांडल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणावेळी सर्व मागण्या मान्य केल्या. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक उभारणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचं सरकारने प्रकाशन करावं, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तातडीने पावलं उचलावी, अशा मागणअयांचा समावेश आहे.