राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह एनसीपीच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीरगटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाला असला तरी या गटाने अद्याप सर्व समर्थक आमदारांना एकत्रित बोलावून शक्तीप्रदर्शन केलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आहेत? याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार गटाकडे दोन-तृतीयांशासाठी आवश्यक असणारे ३६ आमदार नाहीत. त्यामुळे पक्षांतर कायद्यानुसार, अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील, असं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “…तेव्हा अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला नाही”, बंद दाराआड झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचा खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाकडे ३६ आमदार नाहीत. अजूनपर्यंत त्यांच्याकडे ३६ आमदार दिसले नाहीत. त्यांच्याकडे ३६ आमदार असते तर त्यांनी प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटो काढला असता. त्यामुळे त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल. ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होईल.
हेही वाचा- “आधी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं, आता…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल!
“सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा निर्णय ‘हो’ किंवा ‘नाही’, असं झाला पाहिजे. हे आमदार निलंबित होणार नसतील तर त्यांच्याकडील ३६ आमदारांचा आकडा त्यांनी दाखवावा. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे,” असंही चव्हाण म्हणाले.