Ajit Pawar Maharashtra Cabinet : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांनी अजित पवारांना ‘जटंलमन’ नेत्यांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. तसेच अजित पवार हे एकनाथ शिंदेंना बाजूला करून भाजपाच्या व देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी त्यांचं मत सविस्तरपणे सांगितलं. ते म्हणाले, “अजित पवारांनी आता स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आहेत. आता त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही.

संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की मंत्रिमंडळात अजित पवार हे सर्वात प्रगल्भ मंत्री होते. अजित पवार हे अभ्यासू नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या मते अजित पवार हे अत्यंत भरवशाचे सहकारी होते. ते अनेक कामे सहज मार्गी लावायचे. एखाद्याला आपल्या मर्यादा समजल्या, रिंगण कळलं किंवा त्याची रेषा दिसली की तो यशस्वी होतो आणि शांतपणे काम करतो. अजित पवार यांना सध्या मुख्यमंत्री व्हायचं नाही असं मला दिसतंय. अजित पवार यांनी त्यांच्यावरचं कारवाईचं बालंट होतं ते पक्षांतर करून दूर करून घेतलं आहे. अंमलबजावणी संचालनालय व सीबीआयच्या ताब्यातील त्यांची १,००० कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी सोडवून घेतली आहे. राजकारणातील एखाद्या माणसाला यापेक्षा अधिक काय महत्त्वाचं असतं?”

अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही : संजय राऊत

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्याच शिंदे यांना आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असताना देखील मुख्यमंत्री व्हायचं आहे. दुसरीकडे अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही. हा या दोन नेत्यांमधील फरक आहे”.

दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी महायुतीमध्ये विसंवाद असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “महायुतीच्या मंत्र्यांमधील संवाद नक्कीच कमी झालेला दिसतोय. तसेच त्यांचा खासदारांशी संवाद नाही. याचं कारण लोकसभेला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले त्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधणं मुख्यमंत्र्यांना ठीक वाटत नसावं. पण हे चुकीचं आहे. जे आपल्या राज्याचे प्रतिनिधी आहेत, दिलेली कामे करतात, आपले प्रश्न मांडतात त्यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी त्यांना माहिती देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे.

Story img Loader