Ajit Pawar on Eknath Shinde Maharashtra Budget 2025 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून आज (१० मार्च) विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर शाब्दिक कुरघोडी करत चिमटा काढल्याचं पाहून सभागृहात एकच हशा पिकला होता. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची एकनाथ शिंदेंच्या मनातून अद्याप गेलेली नाही अशा अर्थाची टिप्पणी अजित पवारांनी यावेळी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात सुरुवात केल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या नव्या सरकारच्या कार्यकाळातील हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असून आम्ही आज पहिला अर्थसंकल्प मांडला. राज्याचा याआधीचा अर्थसंकल्प मांडला तेव्हा देखील आम्ही तिघेजण इथे होतो, आजही आहोत. यावेळी फक्त खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे.” यावर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे इशारा केला व त्यांना म्हणाले, “ते काही मनातनं जात नाही”. यावर सभागृहात एकच हशा पिकला. फडणवीसही यावर हसले.

अजित पवारांच्या चिमट्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “खुर्च्यांची अदबलाबदल झाली असली तरी टीम तीच आहे”. त्यावर फडणवीस म्हणाले, “अदलाबदल झाली असली तरी बदलाबदल झालेली नाही. त्यानंतर शिंदे म्हणाले, “आम्ही एक टीम म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून चांगलं काम करत आहोत. तेच काम आताही आम्ही पुढे नेत आहोत. आज आमच्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आहे.

अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून एकनाथ शिंदेंची फिरकी

अधिवेशनाच्या सुरुवातीला घेतलेल्या पत्रकार परिषदेतही अजित पवारांनी अशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली होती. त्यावेळी, महायुती सरकारची नवीन टर्म असली तरी टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) खुर्चीची आदलाबदल झाली आहे. पण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे”, असं मिश्कील वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावर लगेचच अजित पवार यांनी देखील गंमतीदार उत्तर दिलं. “तुम्हाला (एकनाथ शिंदे) खुर्ची (मुख्यमंत्री पदाची खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू”, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली.