बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आपल्या गटाचा उमेदवार उभा करणार आहेत, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी तसे सुतोवाच केले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी बारामतीमध्ये भावनिक आवाहन केले. यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या संभाव्य आरोपांवर पलटवार केला. तसेच अजित पवार यांनी बंड का केले? बंडाच्या आधी आणि नंतर काय काय झाले? याची सर्व माहिती बारामतीकरांना दिली. आगामी निवडणुकीत माझ्याविरोधात प्रचार केला जाईल, त्याला बारामतीच्या जनतेनं उत्तर द्यावं, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती येथील सभेत अजित पवार म्हणाले की, “आमचे वरिष्ठ (शरद पवार) मध्यंतरी बोलले मी राजीनामा देतो. आम्ही कुणीही राजीनामा मागितला नव्हता. वरिष्ठांच्या इच्छेनंतर आम्ही सर्व नेते बसून आताच्या खासदार (सुप्रिया सुळे) यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या इतर नेत्यांना मी विश्वासात घेऊन हे मान्य केलं. पण दोन-तीन दिवसांत काय चक्र फिरली माहीत नाही, ते म्हणाले मीच अध्यक्ष राहतो. आम्ही सातत्याने वरिष्ठांना सांगत होतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुमत राहिले नाही तर आपण देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊ. पण त्यालाही विलंब झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.”

“इथून पुढे धुवून काढेन”, नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर; निलेश राणेंना म्हणाले, “तुमच्या वडिलांना…”

मी मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेलो नाही

मी मुख्यमंत्रीपदाकरिता हपापलेल माणूस नाही, असेही अजित पवार म्हणाले. “२००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिक जागा येऊनही वरिष्ठांनी उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानले. त्यांचे आदेश शिरसावंद्य मानले. तेव्हाही मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो. तेव्हा आर. आर. पाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकले असते. कारण ते त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. मी २०१० साली उपमुख्यमंत्री झालो”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालो

“लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांच्या मताला महत्त्व असतं. आमच्या पक्षातील अनेक आमदारांनी सांगितले की, भूमिका घ्या. पण वरिष्ठ काही ऐकायला तयार नव्हते. उद्धव ठाकरे सरकार जेव्हा जाणार हे स्पष्ट झालं, तेव्हा माझ्या दालनात सर्व आमदारांनी सह्या करून आपण भाजपाबरोबर सरकारमध्ये जाऊ, हे मान्य केले. तेही (भाजपा) आम्हाला घ्यायला तयार होते. पण वरिष्ठांनी ऐकले नाही. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही पुन्हा वरिष्ठांना भेटून याबाबत विचारणा केली. पण वरिष्ठांनी उत्तर दिले नाही. शेवटी २ जुलै रोजी आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना आम्ही निवडणूक आयोगासमोर गेलो आणि आमची भूमिका मांडली. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हाध्यक्ष आमच्याबाजूने आले. कारण त्यांनाही कळत होते की, आम्ही घेतलेला निर्णय पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी घेतला”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांचे ‘पवार कुटुंबा’वर बोलताना मोठे विधान; म्हणाले, “आमच्या घरातील…

मी सख्ख्या भावाच्या घरी जन्मलो ही चूक झाली का?

वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केले तर आम्ही चांगले आणि मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर चोर ठरलो का? म्हणजे वरिष्ठांच्या पोटी आम्ही जन्माला आलो असतो तर आम्ही चांगले. मग अध्यक्षही झालो असतो, पक्षही ताब्यात आला असता. शेवटी सख्या भावाच्या पोटीच जन्माला आलो ना. म्हणून सांगतो लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करतील, त्याकडे लक्ष देऊ नका, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांच्या विचाराचा खासदार केंद्रात गेला तरच बारामतीकरांची राहिलेली कामे पूर्ण होतील. बारामती-फलटण रेल्वेचे काम पूर्ण होईल. त्यामुळे बारामतीकरांनी केंद्र सरकारच्या विचारांचा खासदार निवडून द्यावा. त्यामुळे पक्ष चोरला असं जे म्हणत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar emotional appeal to baramati voters ahead of lok sabha polls 2024 kvg
Show comments