पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (१ ऑगस्ट) पुणे येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत आणि टिळक स्मारक समितीच्या डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकांविषयी शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांसह अनेक राजकीय विश्लेषकांनी शरद पवारांमुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याची वक्तव्ये केली आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांना शरद पवारांच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, हा कार्यक्रम फार पूर्वीच ठरला होता. सर्वांना माहिती आहे की, टिळक परिवाराची ही संस्था आहे. या संस्थेद्वारे आतापर्यंत अनेक दिग्गजांना हा पुरस्कार दिल्याचं आपण पाहिलं आहे. यावेळी संस्थेतील लोकांनी ठरवलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा पुरस्कार दिला जावा. परंतु, पंतप्रधानांशी संपर्क कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी शरद पवारांशी संपर्क केला.
टिळक स्मारक समितीच्या विनंतीनंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून या कार्यक्रमाची त्यांना माहिती दिली. तसेच शरद पवारांनी पंतप्रधानांना संस्थेच्या वतीने कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. तसेच शरद पवार यांनी स्वतःदेखील तसा आग्रह केला.
हे ही वाचा >> “सरदार पटेल म्हणाले, मी राजीनामा देईन, पण लोकमान्य टिळकांचा पुतळा…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला किस्सा
अजित पवार म्हणाले, इथे राजकीय घटना घडायच्या आधीच (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटण्याच्या आधी) शरद पवार आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये याविषयी बोलणं झालं होतं. शरद पवारांनी पंतप्रधान कार्यालयाला कार्यक्रमाची माहिती दिल्यानंतर त्यांनीदेखील या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं.