भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करतात. अलीकडेच अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पवार कुटुंबावर टीका करण्याची धार कमी केली होती. पण आज (१८ सप्टेंबर) पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांसह शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं आहे. या टीकेनंतर अजित पवार गट आक्रमक झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी अजित पवार गटाने आंदोलन केलं असून पडळकरांवर कारवाईची मागणी केली आहे.
पुण्यासह अकोला आणि इतर काही ठिकाणी अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन केलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला आहे. गोपीचंद पडळकरांना आवर घालावी, अन्यथा आम्ही सत्तेत आहोत, हे विसरून जाऊ, अशा शब्दांत मिटकरींनी इशारा दिला.
हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक
‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये अमोल मिटकरी म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या मंगळसुत्र चोराविरुद्ध अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याला (गोपीचंद पडळकर) तत्काळ आवर घालावी, नाहीतर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ.”
हेही वाचा- “सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाविरुद्ध निर्णय देऊ शकतं”, शिवसेना सत्तासंघर्षावर वकिलाचं मोठं भाष्य
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे.”