पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी एका वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र, अजूनही ४ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९मध्ये घडलेल्या घडामोडींची राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. त्यात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत घेतलेल्या शपथविधीचा मुद्दा अग्रक्रमाने चर्चेला दिसत आहे. छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत केलेले दावेही त्याला कारणीभूत ठरले आहेत. मात्र, दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका विधानाचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्या विधानाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळांची मुलाखत, सुप्रिया सुळेंचं उत्तर!
सध्या राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ व सुप्रिया सुळे ही नावं चर्चेत आली आहेत. “२०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपासोबत जायचं हा निर्णय शरद पवारांनीच घेतला होता. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अजित पवारांनी भाजपाला दिलेला शब्द पाळला, त्यांनी बंडखोरी केली नव्हती” असं छगन भुजबळ एका मुलाखतीत म्हणाले. त्यावर “भुजबळांनी मोजून चार वेळा तरी सांगितलंय की शरद पवारांना अंधारात ठेवून भाजपासोबत जाण्याचं पाऊल उचललं गेलं”, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकीकडे यावर जोरदार चर्चा रंगत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर त्यांना पहिला हार मी घालेन, अशा आशयाचं विधान सुप्रिया सुळेंनी केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली. पत्रकारांनी आज सकाळी छगन भुजबळांना या विधानाबाबत विचारणा केली असता भुजबळांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली.
“ती आमची जबाबदारी आहे”
सुप्रिया सुळे आपल्याला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या आहेत, असं भुजबळ यावेळी म्हणाले. “सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पहिला हार त्यांना घालेन. सुप्रिया सुळे मला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमचं काम आहे, ती आमची जबाबदारी आहे. आम्ही ते करू”, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय चाललंय? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.