छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनी घडवलं, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे केलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर आक्षेप नोंदविला. तसेच अजित पवार गट यावर काय प्रतिक्रिया देणार? भाजपाबरोबर गेल्यानंतर जुनी भूमिका सोडली का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. त्याला आता अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी मागेही एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील मुख्यालयात जाण्यावरून भाजपाला सुनावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपाच्या नेत्याला सुनावण्याची भूमिका घेतली आहे.
त्याआधी आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेमके काय म्हणाले होते, हे पाहू. योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले.”
अमोल मिटकरी यांनी काय म्हटले?
यावर उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी हे कधीही स्वीकारू शकत नाही. राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक गुरू होत्या. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास नसेल, त्यांनी तो करावा.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांनी गोविंददेव गिरी महाराजांबद्दल काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे. पण खरे शिवचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवरायांच्या गुरू फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ होत्या आणि आध्यात्मिक गुरू म्हणून संत तुकाराम यांनी कार्य केले.
समर्थ रामदास स्वामी यांच्याशी श्री गोविंददेव गिरी महाराजांची तुलना; योगी आदित्यनाथ म्हणाले…
शरद पवार यांचाही योगी आदित्यनाथांना टोला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा शरद पवार यांनीही विरोध केला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वामागे राजमाता जिजाऊ यांचा हात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे कर्तुत्व राजमाता जिजाऊंचे आहे. हे कर्तुत्व दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संबंध जगाला इतिहास माहीत आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.