राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून पक्षात पडली नसल्याचं सांगण्यात येत आहे. पण निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं एकप्रकारे मान्य केलं असून ६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्ष सुरू असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत शरद पवारांची भेट घेतली आहे. याबाबतचे फोटो प्रफुल्ल पटेल यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
संबंधित फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे संकोचित मनोवृत्तीचे नाहीत. त्यांचा विचार खूप व्यापक आणि मोठा आहे. उद्या कदाचित नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर आले तर शरद पवार त्यांच्याशीही व्यवस्थित बोलतील, अशा प्रतिक्रिया खासदार चव्हाण यांनी दिली. ‘त्या’ टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.
हेही वाचा- “होय, पक्षात फूट पडली नाही, पण अध्यक्ष बदललाय”, जयंत पाटलांच्या विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोबाबत विचारलं असता वंदना चव्हाण म्हणाल्या, “आपल्याला माहीत आहे की, शरद पवार हे संकोचित मनोवृत्तीचे नाहीत. त्यांचा विचार खूप व्यापक आणि मोठा आहे. उद्या कदाचित नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर आले तर ते त्यांच्याशीही व्यवस्थित बोलतील. वैयक्तिक संबंध वेगळे असतात. कुणी आपल्या शेजारी येऊन बसलं तर त्याला उठून जा किंवा आम्ही उठून जातो, असं शरद पवार कदापि म्हणणार नाहीत. असं कुणीच करू नये. राजकीयदृष्ट्या आम्ही वेगळे आहोत, हे शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे कुणी गल्लत करू नये.”
हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक
‘एक्स’वर (ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल म्हणाले, “नवीन संसद भवनातील पहिला दिवस ऊर्जा देणारा होता. राज्यसभेच्या सभागृहाची इमारत आश्चर्यकारक आहे. हा क्षण शरद पवारांबरोबर साजरा करता आल्याने तो आणखीनच खास बनला. यावेळी कॅफेटेरियामध्ये मित्रांबरोबर स्नॅक्स आणि सौहार्दाचा आनंद घेता आला. हा दिवस खरोखरच अविस्मरणीय आहे.”