उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर वाढलेल्या पोटावरून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनीही अजित पवारांविरोधात खोचक टोलेबाजी केली. “अजितदादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला, तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अॅब्ज’ केले असतील. पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो,” असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.
जितेंद्र आव्हाडांच्या टोलेबाजीला अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. राखी सावंत नेहमी काहीतरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा प्रयत्न करते. तसेच जितेंद्र आव्हाड करत असतात, अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
अजित पवारांवरील टीकेला उत्तर देताना सूरज चव्हाण म्हणाले, “जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. मी त्यांना राखी सावंत का म्हणतोय? कारण ती चित्रपटसृष्टीत असली तरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. तसेच जितेंद्र आव्हाड आहेत. नेहमीच प्रसिद्धीझोतात येण्यासाठी काहीतरी वादंग निर्माण करणं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवणं हा त्यांचा व्यवसाय आहे.”
हेही वाचा- “दादा, तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक…”, अजित पवारांच्या वाढलेल्या पोटावर आव्हाडांची मिश्कील टिप्पणी
“जितेंद्र आव्हाड कधीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. ते कधीही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत नाहीत. ते कधीही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाहीत. ते फक्त विचारधारेच्या गोष्टी करतात. विचारधारेच्या गोष्टी करून ते भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याच्या पत्रावर सहीही करतात आणि संधी बघून ते विरोधही करतात, असे जितेंद्र आव्हाड आहेत”, अशा शब्दात सूरज चव्हाणांनी टीकास्र सोडलं.