अजित पवार बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असले, तरी त्यांच्यासह बंडखोर गटाचे ९ मंत्री अद्यापही विनाखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळेच खातेवाटप व मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी तारीखच जाहीर केली आहे.
सुनील तटकरे म्हणाले, “राज्याचं मंत्रीमंडळ स्थापन झाल्यापासून अजित पवार दिल्लीला गेलेले नाहीत. हा काही तिढा नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. ज्यावेळी एकत्रितपणे काम करायचं ठरलेलं असतं त्यावेळी त्याबाबतची जाणीव मनात ठेऊन काम करणं गरजेचं असतं.”
“उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय होईल”
“मला वाटतं की, याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्तरावर घेतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर एकजुटीने काम करण्यासाठी बरोबर आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय झालेला तुमच्यासमोर येईल,” असंही सुनील तटकरेंनी नमूद केलं.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? नीलम गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या, “एकनाथ शिंदे गुवाहटीवरून…”
खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
दरम्यान, बच्चू कडू खातेवाटपावर म्हणाले होते, “खातेवाटपामध्ये काही गोष्टींमध्ये किंतू परंतू असू शकतो. प्रत्येकाला वाटतं की, अजित पवारांकडे अर्थखातं जायला नको. मागच्यावेळी अजित पवारांनी जो कारनामा केला, तर ते यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे. तसं पुन्हा यावेळी होईल की काय अशी आमदारांना भीती आहे.”
“चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे…”
“प्रत्येक आमदाराला असं वाटतं आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं गेलं, तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे, इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील. म्हणून सर्वांना वाटतं की, अर्थखातं अजित पवारांना देऊ नये,” असा दावा बच्चू कडूंनी केला होता.
“आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला”
“आमदारांची नाराजी दूर करणं हे सरकारपुढे मोठं आव्हान आहे. कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदं गेली आहेत. त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटतं की, आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला. त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच आहे,” असंही बच्चू कडूंनी नमुद केलं होतं.