पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे. तर तेलंगणात काँग्रेसने विजय मिळवला. या विधानसभा निवडणूक निकालावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. लोकांच्या मनात शंका असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हवी, अशी मागणी राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं आहे? हे संजय राऊत यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पाहावं. येत्या २०२४ आणि २०२९ च्या निवडणुकीतही संजय राऊत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतील, असा टोला अनिल पाटलांनी लगावला. ते नाशिक येथे ‘एनआयए’ वृत्तसंस्थेशी बोलत होते.
राऊतांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता अनिल पाटील म्हणाले, “जेव्हा एखाद्या पक्षाचा पराभव होतो. तेव्हा जनतेचा जनादेश स्वीकारायला हवा. संजय राऊतांना काहीही कामं नाहीत. संजय राऊतांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जावं आणि भाजपाचे सर्वेसर्वा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम बघावं. राजकारण बाजूला ठेवून त्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, लोक कोणाबरोबर आहेत. जेव्हा जेव्हा लोक भाजपा किंवा एनडीए आघाडीबरोबर उभे राहतील, तेव्हा तेव्हा संजय राऊतांचा हा आरोप कायम राहील.”
“यापुढेही २०२४ आणि २०२९ मध्येही मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं, अशी मागणी संजय राऊत कायम करत राहतील. पण त्यांनी लोकांमध्ये जावं, लोक काय करतायत आणि त्यांना काय हवं आहे, याकडे लक्ष द्यावं,” असा टोला अनिल पाटलांनी लगावला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
चार राज्यांचा निवडणूक निकाल समोर आल्यानंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, चार राज्यांचा जनादेश समोर आला आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यांमध्ये वेगळा जनादेश आहे. भाजपाने मोठा विजय नोंदवला. जनादेशाचे स्वागत करायला हवं. परंतु लोकांच्या मनात शंका आहे. हे कसं शक्य झालं? विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये. त्यामुळे माझं मत असं आहे की, लोकांच्या मनात शंका असेल तर ती दूर करावी. बॅलेट पेपरवर एक निवडणूक घ्यावी. फक्त एक निवडणूक घ्यावी आणि संशय दूर करावा”