राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या गटातील एकूण ९ आमदारांनी पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथही घेतली असून खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मात्र, अजित पवार गटाला नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे, याविषयी अद्याप स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही. दोन्ही गटांकडून त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली जात नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखीन तीन आमदार अजित पवार गटात सामील होणार असल्याचा मोठा दावा अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके किती आमदार पाठिशी?

२ जुलै रोजी राजभवनावर शपथविधी झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वारंवार प्रफुल्ल पटेल यांना नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे? अशी विचारणा केल्यानंतरही पटेल यांनी तो आकडा सांगितला नाही. अजूनही अजित पवार गटाच्या आमदारांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथ घेतलेले ९ मंत्री आणि त्यांच्यासह गेलेले दोन खासदार एवढेच लोक अजित पवार गटात असल्याचा दावा केला जात आहे.

४० आलेत, आणखी येतील?

दरम्यान, या सर्व मुद्द्यांवर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी टीव्ही ९ शी बोलताना मोठा दावा केला आहे. सध्या अजित पवार गटाकडे ४० आमदारांचं पाठबळ असून आणखीन तीन आमदार शरद पवारांकडून अजित पवारांकडे येतील, असा दावा त्यांनी केला आहे. “आणखीन आमदार येणार आहेत. पाहा तुम्ही आणखीन काय होतंय ते. ४० आमदारांचे ५० आमदार होतील. आम्ही विकासाच्या सोबत चालणारे आहोत”, असं अत्राम म्हणाले.

“आधी मला वाटायचं की शरद पवारांनीच हे घडवलं, पण…”, बच्चू कडूंचं सूचक विधान!

“ते (शरद पवार गट) दावा करणारच की आमच्याकडचे आमदार त्यांच्याकडे जातील. पण त्यांनी दावा केल्यानंतर आज आमच्याकडे तीन आले. आणखीन तीन आमदार येतील. माझं टार्गेट ५०चं होतं, ५० होतील आमच्याकडे”, अशी खात्रीच धर्मरावबाबा अत्राम यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar faction minister dharmaraobaba atram claims more mlas will leave sharad pawar pmw