मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील विविध मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील यांनी अशाप्रकारे अचानक खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खासदार पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पदाचा राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे.
हेमंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. माझ्या तालुक्यातील समाज बांधव आणि मराठा समाजाच्या संघटना जसं सांगतील तसा निर्णय मी घेणार आहे. त्यांनी राजीनामा द्यायला सांगितला तर माझी राजीनामा द्यायची तयारी आहे, असं विधान आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे. अतुल बेनके यांच्या विधानानंतर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा- मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा! लोकसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले पत्र
मराठा आरक्षणावर भाष्य करताना आमदार अतुल बेनके म्हणाले, “माझ्या तालुक्यातील माझे सर्व समाजबांधव, मराठा समाजाच्या सर्व संघटना मला जी दिशा सांगतील, त्या दिशेनं वाटचाल करण्याची माझी तयारी आहे. ते जर म्हणाले की, अतुल, तू राजीनामा दे… तर माझी राजीनामा द्यायची तयारी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता माझे समाजबांधव जसं सांगतील, तसं पुढे जाण्याची माझी तयारी आहे.”