अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून ५ जुलै रोजी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यातून अजित पवार गटातील काही नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली. तर स्वत: अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, असं विधान केलं.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करणं, त्यांच्या गटातील अनेक आमदारांना आवडलं नाही. त्यामुळे अनेकजण शरद पवार गटाकडे परत येण्याच्या भूमिकेत आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “काही लोक जेव्हा अजित पवारांच्या कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा काही नेत्यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला. त्यांच्याविरोधात काही नेत्यांनी टीका केली. त्यामुळे व्यासपीठावर बसलेले ३० ते ४० टक्के लोक पुन्हा मागे फिरण्याच्या भूमिकेत आहेत. आमदारांचीही तशीच परिस्थिती आहे. पण त्यांना एका खोलीत डांबून ठेवल्याने संबंधित आमदारांना तिथेच थांबावं लागलं आहे. जे आमदार तिकडे (अजित पवार गटात) गेले होते, तेही म्हणतायत की, काहीतरी चुकतंय. शेवटी हे सगळे राजकीय लोक आहेत, मतदारांमध्ये काय चर्चा आहे? याचा अंदाज आता पदाधिकाऱ्यांनाही आला आहे. त्यामुळे पुन्हा पक्षबांधणी करत असताना, जे आमच्याबरोबर राहिले आहेत, त्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका शरद पवारांची १०० टक्के असणार आहे. त्याचबरोबर जे पलीकडे गेले आहेत. ते परत आले तर पलीकडे जाण्याचं कारण काय होतं? याची शाहनिशा करून त्यातील काही लोकांबद्दल शरद पवार सकारात्मक निर्णय घेतील.”
किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? त्यातील कितीजण परत येण्याच्या विचारात आहेत? असं विचारलं असता रोहित पवार पुढे म्हणाले, “पुढच्या १०-१५ दिवसांत काय होतंय ते बघा. मला हे कळत नाही की, ३६ आमदारांचा आकडा आपल्याला कशाला पाहिजे? दोन-तृतीयांश बहुमत हे राजकीय पक्षावर दावा करण्यासाठी लागत नसतं. हे संख्याबळ दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लागतं. त्यामुळे त्या गटाची (अजित पवार गट) भूमिका भाजपात विलीन होण्याची आहे का? अशी भूमिका असेल तर ती आपल्याला नंतर कळेलच. याबाबत अजून त्यांच्या गटातील आमदारांना माहीत नाही. त्यांना ही भूमिका कळली तर तिकडे गेलेले ९० ते ९५ टक्के आमदार परत येतील.”