PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024: लोकसभा निवडणूक निकालांनंतर आता चर्चा आहे ती केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्रीपदांची. एकीकडे भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे घटकपक्षांच्या समर्थनावर सरकार स्थापन करावं लागत आहे. त्यामुळे घटकपक्षांच्या मागण्याही भाजपाला पूर्ण कराव्या लागणार असं चित्र सध्या दिसत आहे. त्याचंच प्रतिबिंब मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील शपथविधीमध्ये पडलेलं पाहायला मिळत आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना मंत्रिमंडळात यथोचित स्थान दिल्यानंतर आता इतर घटकपक्षांमध्ये मंत्रीपदांचं वाटप कसं होईल, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाच्या ७ जागा निवडून आल्या असून त्यांना एक मंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, अजित पवार गटाकडून सुनील तटकरेंच्या रुपाने एकमेव खासदार निवडून आले. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला भाजपाकडून स्वतंत्र पदभाराचं राज्यमंत्रीपद देऊ केलं. मात्र, ही ऑफर अजित पवार गटानं फेटाळून लावल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली. पण दोन्ही बाजूंनी नेमकी काय चर्चा झाली? यावर आता खुद्द अजित पवारांनीच स्पष्टोक्ती दिली आहे.

अजित पवार दिल्लीत, शपथविधीला उपस्थित राहणार!

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदी तिसऱ्या शपथविधीसाठी एनडीएच्या इतर घटक पक्षांप्रमाणेच अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर घटकपक्ष उपस्थित आहेत. मात्र, शपथविधीच्या काही तास आधी अजित पवार गटाला यंदा एकही मंत्रीपद मिळणार नसल्याचं समोर आलं. त्यासंदर्भात तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. दिवसभर झालेल्या या चर्चेवर संध्याकाळी अजित पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश टाकला.

Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: “…म्हणून केंद्रीय मंत्रीपद नाकारलं”, श्रीकांत शिंदेंनी सांगितलं कारण; उद्धव ठाकरेंना लगावला टोला!

काय म्हणाले अजित पवार?

“काल रात्री आमच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्याआधी आम्ही सगळे, राजनाथ सिंह, अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यासह आमची सविस्तर चर्चा झाली. निकाल असे का आले? यावर आम्ही बोललो. तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की सध्या लोकसभेत एक आणि राज्यसभेत एक असे आमचे दोन खासदार आहेत. पण येत्या दोन-तीन महिन्यांत आमचे राज्यसभेत एकूण तीन खासदार होणार आहेत. त्यामुळे लोकसभेत सुनील तटकरे मिळून राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या संसदेत ४ होईल. म्हणून आम्हाला एक मंत्रीपद मिळायला हवं असं आमचं बोलणं झालं. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे”, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले “आम्ही…”

“त्यानंतर काल त्यांचा आम्हाला संदेश आला की एकनाथ शिंदेंना जसा स्वतंत्र कार्यभाराचं एक मंत्रीपद दिलंय, तसंच आम्हालाही राज्यमंत्री स्वतंत्र पदभार असं मंत्रीपद दिलं जाईल. प्रफुल्ल पटेल केंद्रात कॅबिनेट मंत्री राहिले आहे. त्यानंतर आता त्यांनी स्वतंत्र कार्यभार घेणं आम्हाला योग्य वाटलं नाही. त्यामुळे आम्ही सांगितलं की आम्ही काही दिवस थांबायला तयार आहोत, पण आम्हाला केंद्रात मंत्रीपद हवंय. हे ऐकल्यावर ते राजी झाले”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar faction no cabinet berth for praful patel speaks on narendra modi oath taking ceremony pmw