Sharad Pawar NCP MPs Recieved Proposal: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीसाठी निराशाजनक ठरले. महायुतीला २३५ जागांचं घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीत धोरणांवर पुनर्विचार सुरू झाला. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अपयशावरही चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत ८ खासदार निवडून आणणाऱ्या शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या ८६ जागांपैकी अवघ्या १० ठिकाणी विजय मिळाला आहे. त्यामुळे शरद पवार व अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याचदरम्यान, पडद्यामागे हालचाली वाढल्या आहेत!
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शरद पवारांच्या ८ पैकी ७ खासदारांना आपल्याकडे येण्याची ‘ऑफर’ देण्यात आली होती. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या सर्व घडामोडी घडल्या. शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व खुद्द पवार यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व ७ लोकसभा खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येण्याबाबत विचारणा करण्यात आली होती, असं या वृत्तात म्हटलं आहे.
‘ऑफर’संदर्भात खासदारांची भूमिका?
शरद पवारांचे खासदार अजित पवारांकडे आल्यानंतर त्यांचं रीतसर पुनर्वसनही केलं जाईल, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र, अजित पवारांच्या पक्षाकडून आलेली ही ऑफर शरद पवारांच्या खासदारांनी नाकारली. “आमच्या पक्षातल्या ७ खासदारांना शरद पवार व सुप्रिया सुळे यांना वगळून अजित पवारांच्या पक्षात येण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता. पण त्या खासदारांनी हा प्रस्ताव नाकारला आहे”, असं पक्षातल्या एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
शरद पवार नाराज, अजित पवारांच्या नेत्यांना सुनावलं
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांबाबत शरद पवारांना माहिती मिळताच शरद पवार नाराज झाले व त्यांनी या नेत्यांना सुनावल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारांनी या नेत्यांना यापुढे असे प्रयत्न न करण्यास बजावलं असल्याचंही बोललं जात आहे. “असं झालं असतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक पक्षफूट पाहायला मिळाली असती. त्यामुळे शरद पवारांनी या घडामोडी अत्यंत गांभीर्याने घेतल्या”, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
अजित पवार गटाची भूमिका काय?
एकीकडे या सर्व चर्चा चालू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. “आम्ही केंद्रात एनडीए आघाडीत आहोत. महाराष्ट्रातही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीला राज्यात मोठं बहुमत आहे. आमचं धोरण स्पष्ट आहे. आम्ही सरकारसोबत राहणार आहोत आणि यावर कोणताही पुनर्विचार केला जात नाहीये”, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.
राज्यात येत्या काही महिन्यांत २९ महानगर पालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.