Ajit Pawar And Amol Mitkari : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला होता. महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरायलाही सुमारे दोन आठवडे लागले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीलाही आता आठवडा होत आला आहे. तरीही नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. अशात राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी जर अजित पवारांना अर्थ खाते मिळणार नसेल तर सरकारलाच अर्थ राहणार नाही, असे म्हटले आहे. असे विधान आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना केले होते.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

राज्याच्या अर्थ खात्याविषयी बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, “अर्थ खाते अजित पवारांकडे असल्याशिवाय राज्याला अर्थिक शिस्त लागू शकत नाही. जर हे अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे नसेल तर या सरकारलाही काही अर्थ आहे की नाही असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतोय. अजित पवार यांनी दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्याला अर्थिक शिस्त लावायची असेल तर अजित पवार हेच महायुतीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून शोभतात. दुसरा असा कोणता नेता असेल असे मला वाटत नाही.”

हे ही वाचा : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”

महत्त्वाच्या खात्यांसाठी सर्वांचेच प्रयत्न

राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली आहे. त्यानंतर महायुतीतील अनेक आमदार नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील त्या-त्या पक्षाचे नेतृत्त्व जास्तीत जास्त मंत्रिपदे आणि महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

२०२२ मध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सुमारे ४० आमदारांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खाते मिळाले होते. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी तब्बल दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या वाट्याला पुन्हा एकदा अर्थ खाते यावे म्हणून आग्रही आहे.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रिपदे आणि चांगली खाती मिळावीत यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar finance minister mlc amol mitkari mahayuti devendra fadnavis aam