शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर मंत्रीमंडळ विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्ताराला राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. शपथविधी कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी या मंत्रीमंडळ विस्तारावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्या नेत्यांवर आरोप झाले आणि ज्यांना अद्याप क्लीन चिट मिळाली नाही त्यांना टाळलं असतं तर बरं झालं असतं,” असं मत पवारांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (९ ऑगस्ट) एबीपी माझाशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “उशिराने का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रीमंडळ मिळालं. आता लवकरात लवकर महाराष्ट्रातील प्रश्न सोडवावेत. राज्यात पावसासह शेतकरी आणि इतर खूप समस्या आहेत ते सोडवावेत.”
“ते टाळलं असतं तर बरं झालं असतं”
“महाराष्ट्राला मंत्रीमंडळ मिलालं, मात्र एक झालं ज्यांच्यावर आरोप आहेत आणि त्यांना त्यातून क्लीन चिट मिळालेली नाही अशांनाही मंत्रिमंडळात घेतलं गेलं. ते टाळलं असतं तर बरं झालं असतं,” असं म्हणत पवारांनी नव्या मंत्रिमंडळावर निशाणा साधला.
आरोप झालेत आणि क्लीन चिट मिळाली नाही असे नेते कोण?
यावेळी आरोप झालेत आणि क्लीन चिट मिळाली नाही असे नेते कोण असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी नावं घेणं टाळलं. ते नावं माध्यमांना माहिती आहेत, असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलं.
भाजपातून मंत्रिमंडळात कुणाला संधी?
१. चंद्रकांत पाटील</p>
२. गिरीश महाजन
३. सुधीर मुनगंटीवार
४. राधाकृष्ण विखे पाटील
५. मंगलप्रभात लोढा
६. सुरेश खाडे
७. रविंद्र चव्हाण
८. अतुल सावे
९. विजयकुमार गावित
शिंदे गटातून मंत्रिमंडळात कुणाला संधी?
१. दीपक केसरकर
२. दादा भुसे
३. उदय सामंत
४. संदीपान भुमरे
५. तानाजी सावंत
६. शंभुराजे देसाई
७. गुलाबराव पाटील<br>८. अब्दुल सत्तार<br>९. संजय राठोड
हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion Live: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
एकूणच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांकडून टीका होत आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून संधी देण्यात आलेल्या नेत्यांची पाठराखण होताना दिसत आहे.