एकीकडे राज्यात सत्ताधारी तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाची चर्चा चालू असताना दुसरीकडे नुकतेच सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटातील सात मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून रीतसर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी बंगला कायम असून त्यांच्याव्यतिरिक्त इतर सात मंत्र्यांसाठी निवासस्थानांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आदिती तटकरे यांच्या नावाचा मात्र समावेश नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ११ जुलै अर्थात मंगळवारी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. संबंधित निवासस्थाने त्या ठिकाणी राहणाऱ्या मंत्र्यांनी (राहात असल्यास) येत्या १५ दिवसांच्या आत वाटप करण्यात आलेल्या मंत्र्यांसाठी रिकामे करून देण्याचाही उल्लेख या जीआरमध्ये करण्यात आला आहे.
अजित पवार गटासाठीची खाती ठरली? अर्थखात्यासह ‘या’ विभागांची यादी चर्चेत!
कुणाला कोणते निवासस्थान?
अजित पवारांकडे देवगिरी बंगला असताना छगन भुजबळांना ब-६ सिद्धगड बंगला देण्यात आला आहे. हसन मुश्रीफ यांना क-८ विशाळगड बंगला देण्यात आला आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना क-१ सुवर्णगड हा बंगला देण्यात आला असून धनंजय मुंडे यांना क-६ प्रचितगड बंगला दिला आहे.
याव्यतिरिक्त धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील व संजय बनसोडे यांना अनुक्रमे सुरुचि-३, सुरुचि-८ व सुरुचि-१८ ही निवासस्थाने देण्यात आली आहेत.