विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून सभागृहात सरकारला जाब विचारण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्याचवेळी विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलेल्या एका व्हिडीओमध्ये आज विधानसभेतलं वातावरण तापलं. या व्हिडीओमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. यावेळी “किती नालायकपणा कराल? कुठे हे पाप फेडाल? कशासाठी हा नालायकपणा चाललाय?” असे परखड सवाल अजित पवारांनी सभागृहात बोलताना उपस्थित केले.
नेमकं घडलं काय?
आमदार अमोल मिटकरींनी बुधवारी रात्री ट्वीट केलेल्या एका २० सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपची जोरदार चर्चा नागपूर विधिमंडळ परिसरात चालू आहे. या व्हिडीओमध्ये आमदार निवासातील उपहारगृहात कपबशा स्वच्छतागृहात धुतल्या जात असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला. “हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाटी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था”, असं ट्वीट मिटकरींनी हा व्हिडीओ शेअर करताना केलं होतं.
“आमदारांची सोय करण्याची जबाबदारी विधिमंडळाची”
दरम्यान, हा मुद्दा आज अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारला जाब विचारला. “अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून नागपूरला सगळे सदस्य येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था विधिमंडळाला करावी लागते. सरकार कुणाचंही असलं, तरी २८८ आमदार, विधानपरिषदेचे सर्व आमदार, स्टाफ यांची व्यवस्थित सोय करणं हे विधिमंडळाचं काम आहे. असं असतानाही इतक्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. टीव्हीला ही व्हिडीओ क्लिप सारखी दाखवत आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“कशासाठी हा नालायकपणा चाललाय?”
“विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी एक छोटी व्हिडीओ क्लिप तयार केली आणि त्यात स्वच्छतागृहातच आमदारांना दिल्या जाणाऱ्या चहाच्या कपबशा धुवायचं काम चालू असल्याचं दिसतंय. किती नालायकपणा कराल? कुठे हे पाप फेडाल? कशासाठी हा नालायकपणा चाललाय? संबंधित कंत्राटदाराला करोडो रुपये दिले जातात. त्यात कुठेही हयगय केली जात नाही. सरकार जसं सांगतं, त्याप्रमाणे सगळे सदस्य गेटबाहेर उतरतात. सुरक्षेच्या दृष्टीने जे काही पोलीस यंत्रणा सांगेल ते मुख्यमंत्र्यांपासून सगळे सदस्य पाळतात. एवढं सगळं असताना, आधी सगळा स्टाफ इथे येऊन सगळी तपासणी करत असतानाही हे असं घडतंय”, अशा शब्दांत अजित पवारांनी संतप्तपणे भूमिका मांडली.
“हे कुणाचे बगलबच्चे आहेत का?”
“आमदार निवासामध्येही प्रवेशाला फक्त चांगली रंगसंगती केली आहे. मेकअप केल्यासारखं केलंय. आत रुममध्ये गेलं तर इतकी वाईट अवस्था आहे की आमदार तिथे राहू शकत नाहीत. करोनामुळे एकतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकलं नाही. असं असताना आता अधिवेशन होतंय. आमचं तर म्हणणं आहे की तीन आठवडे अधिवेशन चालावं. पण आजही कुठे पाणी नाही, कुठे ड्रेनिज तुंबलंय, कुठे जेवण घाण मिळतंय. फोटोतही आलंय की टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात आहेत. ही कुठली पद्धत आहे? कुणाचे इतके लाड? हे कुणाचे बगलबच्चे आहेत का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
“सरकारचं लक्ष आहे कुठे?”
“संबंधित अधिकाऱ्यांनाही निलंबित केलं पाहिजे. कंत्राटदारालाही काळ्या यादीत टाकलं पाहिजे. एक संदेश गेला पाहिजे की असे गैरप्रकार होता कामा नये. दृष्टीआड सृष्टी असं बोललं जातं. हे फोटो निघाले म्हणून. नाहीतर कुठलं पाणी वापरतात, काय करतात, कुठला चहा प्यायला देतात, कसले हात वापरतात काहीच माहिती नाही. पोलिसांनाही जेवण नाही. किती तास ड्युटी करतात तिथेही लक्ष नाही. मग सरकारचं लक्ष आहे कुठे? हे बरोबर नाही. अशा प्रकारे या गोष्टी होता कामा नयेत, याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांनी मांडलेल्या या तक्रारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित कंत्राटदार आणि इतर संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.