गेल्या महिन्याभरात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यात जशी राष्ट्रवादीला रामराम ठोकत एकनाथ खडसेंची घरवापसी आहे तसंच आधी आक्रमक झालेले विजय शिवतारे अचानक माघार घेऊन आपण महायुतीमध्येच असल्याचं जाहीर करत सर्वकाही शांत झाल्याचाही मुद्दा आहे. मात्र, या मुद्द्यांवर अजूनही राजकीय वर्तुळात मात्र चर्चा चालूच आहे. यासंदर्भात अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अजित पवार चांगलेच संतापले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या भिडे वाड्यात अजित पवारांनी स्मारक स्थळाचं दर्शन घेतलं. महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवारांनी स्मारकाचं नुतनीकरण करण्याचा निर्णय सांगितला. “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ असे आम्ही सगळ्यांनी मिळून महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचं स्मारक करायचं ठरवलं आहे. आधीच स्मारक आहे, पण जागा कमी पडतेय. त्यामुळे आसपासची जागा घेऊन तिथे काम केलं जाईल”, असं ते म्हणाले.
“भिडे वाड्यात जिथे पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली होती, तीही जागा आता पालिकेच्या ताब्यात आली आहे. त्याचे पाच ते सहा आराखडेही तयार झाले आहेत. या दोन्ही कामांना निधीची अडचण भासणार नाही, ही ग्वाही सरकारकडून मी देतो”, असं अजित पवार म्हणाले.
विजय शिवतारेंबाबत अजित पवार म्हणाले…
दरम्यान, गेल्या महिन्यात चर्चेत आलेल्या विजय शिवतारेंच्या बंडखोरीच्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाष्य केलं. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यासह विजय शिवतारेंनीही बंडाचं निशाण फडकावून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, चर्चेअंती त्यांनी माघार घेतली. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं.
“विजय शिवतारेंनी एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर मी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह बसलो होतो तेव्हा त्यांच्या भागातले महत्त्वाचे विषय मांडले. ते म्हणाले की मी महायुतीबरोबर आहे, पण ते विषय सरकारनं मार्गी लावायला हवेत असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो. त्या सभेला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यावं. तेव्हा आम्ही तसा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी ११ तारखेला तिथल्या मैदानात सभा आयोजित केली आहे. त्या सभेला मुख्यमंत्री व मीही जाणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.
शिवतारेंना कुणाचे फोन आले होते?
यावेळी राजकीय प्रश्न विचारायचा आहे, असं उपस्थित माध्यम प्रतिनिधीने म्हणताच “अरे अरे अरे.. कुठंही काहीही…”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. पत्रकारांनी विजय शिवतारेंना यादरम्यान कुणाकुणाचे फोन आले होते? असा सूचक प्रश्न केला असता अजित पवार त्यावर संतापले. “तुम्ही मला मूर्ख समजू नका. मी सांगायचं तेवढं सांगितलं आहे. मला संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं आहे तेवढं मी बोललो आहे”, असं ते म्हणाले.
जागावाटपावर लवकरच चर्चा
एकीकडे महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झालेलं असताना महायुतीमध्ये मात्र काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असं अजित पवार म्हणाले. “जागावाटपावरही निर्णय होतील. नाशिक, कोकण या ठिकाणचे फॉर्म शेवटच्या टप्प्यात भरायचे आहेत. त्याला अजून वेळ आहे. आम्ही त्याबाबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढू”, असं ते म्हणाले.