Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी कालच पुढील चार दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. शरद पवारांना खोकला येत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत होती. एका जाहीर कार्यक्रमात त्यांना भाषणही देता आले नाही. त्यानंतर त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या प्रकृतीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस संचलन मैदान, पुणे येथे राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, त्यादिवशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातच त्यांच्या छातीत कफ झालेला जाणवत होता. बोलताना त्यांना अडचण येत होती. त्याचवेळी आम्ही सर्वांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण साहेब म्हणाले की, मला कोल्हापूरला जायचे आहे, तिथे माझा कार्यक्रम आहे. मग ते कोल्हापूरला रवाना झाले.
“मात्र कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांचा त्रास वाढला. मग तिथून ते मुंबईला गेले. आता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे ते विश्रांती घेत आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
दरम्यान २३ जानेवारी रोजी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर अजित पवार व्यासपीठावर आले. त्यावेळी शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. हे पहिल्यानंतर अजित पवारांनी संबधित अधिकार्यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली आणि शरद पवार यांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितले. या कृतीमधून अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याचे बोलले गेले.