राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीने विरोधकांच्या हातात आयतं कोलितच मिळालं. अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत मुख्यमंत्रिपदाचा भार इतर कोणाकडे तरी सोपवण्याचा सल्ला दिला आहे. चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड अशा भाजपा नेत्यांनी आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे अशी नावं सुचवली आहेत. चंद्रकांत पाटलांनी तर रश्मी ठाकरेंचं नावही सुचवलं आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमध्ये जर अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपद दिलं तर ते चारच दिवसांत राज्य विकून मोकळे होतील, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “गोपीचंद पडळकर यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न आहे”, असा टोला मुंडे यांनी लगावला आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली तर ते चारच दिवसात राज्य विकून मोकळे होतील”

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत विविध विषयांवरून जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. पेपरफुटी घोटाळा, शेतकरी मदत, एसटी कर्मचारी आंदोलन अशा मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

आणखी वाचा – उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नाहीत?; चंद्रकांत पाटील म्हणाले “बहुतेक काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुलावरही…”

अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवारांकडे कारभार देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपद दिलं तर ते चारच दिवसांत राज्य विकून खातील, अशी जळजळीत टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar gopichand padalkar dhananjay munde assembly winter session vsk
Show comments