Ajit Pawar Got Support From Ashok Chavhan: राज्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. यामध्ये शेतकरी कर्जमाफीबाबतही आश्वासन दिले होते. परंतु, नवे सरकार स्थापन झाल्यानंतरही शेतकरी कर्जमाफीवर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेली असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कर्जमाफी संदर्भात एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?”

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवार यांचे समर्थन केले आहे. अजित पवार यांनी ज्या अर्थी हे वक्तव्य केले आहे, ते विचारपूर्वक केले असावे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

लोकांना दिलेले आश्वासन…

शेतकरी कर्जमाफीच्या अजित पवार यांच्या मतावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, “राज्याची परिस्थिती पाहून जे वास्तव आहे, ते बोलत आहे. शेवटी अर्थमंत्री या नात्याने त्यांना राज्य चालवायचे आहे. मला वाटते की, मग त्यांनी ज्या अर्थी हे वक्तव्य केलेले आहे, ते विचारपूर्वक केलेले आहे. योग्य वेळी तो निर्णय घ्यावा लागेल. कारण त्यांनी लोकांना जे काही आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता योग्य वेळेतच करावी लागेल. आज कदाचीत ती परिस्थिती नसावी.”

शिवाजी महाराज देशाचे दैवत

यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या शौर्याची आणि प्रशासनाची आठवण आहे. ते मराष्ट्राचे आणि देशाचे भूषण आहेत. त्यामुळे वास्तव आहे की, शिवाजी महाराजांना कुठल्या एका समाजासाठी मर्यादीत ठेवता येणार नाही.”

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी २८ मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत विधान केले होते. पवार म्हणाले होते की, “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आज तारीख आहे २८ मार्च, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा.”

याचबरोबर अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका कार्यक्रमात, “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?”, असा प्रश्न उपस्थितांना केला होता.