राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज ( २० नोव्हेंबर ) सुनावणी पार पडली. या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा उपस्थित होते. सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रतिज्ञापत्रबाबत गंभीर आरोप सिंघवी यांनी अजित पवार गटावर लगावले आहेत.
अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “अजित पवार गटाकडून ९०० प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल केली आहेत. त्यातील अनेक प्रतिज्ञापत्र खोटी आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्राचाही समावेश आहे. याप्रकरणी अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगानं न्यायालयासमोर फौजदारी खटला चालवला पाहिजे.”
“आम्ही अजित पवार गटाला आयोगासमोर उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच, अजित पवार गटाकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी एकही शरद पवारांविरोधातील नाहीत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल,” अशी अपेक्षा अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, निवडणूक आयोगानं अभिषेक मनु सिंघवी यांची कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे. मागील सुनावणीत ज्या मुद्द्यांवर युक्तिवाद केला होता, त्याच प्रतिज्ञापत्रांच्या मुद्द्यांचा उल्लेख करू नका, असं निवडणूक आयोगानं म्हटलं. पुढील सुनावणी शुक्रवारी २४ नोव्हेंबरला होणार आहे.