Amol Mitkari : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल. यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागून आज आठ दिवस झाले. पण अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे. यातच महायुतीच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर देखील काही बैठका पार पडल्या. पण त्यानंतरही मंत्रिपदाचा तिढा सुटला नसल्याचं बोललं जात आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? हे देखील स्पष्ट झालेलं नाही.
यातच दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर आता आघाडीतील नेते कामाला लागले आहेत. तसेच पराभवाची कारणं आघाडीतील नेत्यांकडून शोधण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाबाबत चर्चा झाली. तसेच यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबाबादारी सोपवण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, या निवडीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. “जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला”, असं म्हणत अमोल मिटकरींनी रोहित पाटील यांच्या मुख्य प्रतोद निवडीवरून टीका केली आहे.
तुतारी गटाच्या मुख्य प्रतोद पदी नवखे तरुण आमदार रोहित आर आर आबांवर जबाबदारी देऊन जयंत पाटील साहेबांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केलाय. शिवाय या नावाच्या वैश्विक ज्ञान पाजळणाऱ्या बालिश ला योग्य जागाही दाखवली आहे ?#अभिनंदन?@Jayant_R_Patil @rohitrrpatilncp
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 1, 2024
अमोल मिटकरी काय म्हणाले?
“तुतारी गटाच्या मुख्य प्रतोद पदी नवखे तरुण आमदार रोहित आर आर आबांवर जबाबदारी देऊन जयंत पाटील साहेबांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केलाय. शिवाय या नावाच्या वैश्विक ज्ञान पाजळणाऱ्या बालिश ला योग्य जागाही दाखवली आहे”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd