राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीबाबत शुक्रवारी ( १० नोव्हेंबर ) निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. अजित पवार गटाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शरद पवार यांच्या वकिलांनी आयोगासमोर केला होता. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. याला अजित पवार गटातील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?

जितेंद्र आव्हाड ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हणाले, “निवडणूक आयोगासमोर चिन्ह आणि पक्ष याबाबतच्या वादासंबंधी सुनावणी होती. फुटीर गटातर्फे जे अ‍ॅफिडेव्हीट देण्यात आलं होतं. त्या अ‍ॅफिडेव्हीटमध्ये जी काही प्रतिज्ञापत्र जोडली होती, त्याची चिरफाड अभिषेक मनुसंघवी या ज्येष्ठ वकिलांनी केली. त्यांनी त्या अ‍ॅफिडेव्हिटचे २४ भाग बनवले आणि त्याच्यामध्ये दाखवून दिलं की, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्र जोडली होती, वृद्धांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्य दाखवले होते. मृत व्यक्तींच्या नावाने प्रतिज्ञापत्र होती. एका प्रतिज्ञापत्रावर तर ‘हाऊस वाईफ’ असं नाव लिहिण्यात आलं होतं. काही ठिकाणी एकाचेच नाव तीन वेळा टाकण्यात आलं होतं. एकाच पत्त्यावर अनेक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आली होती. व्हेरिफिकेशन लातूरचं आणि प्रतिज्ञापत्र मुंबईचं, अशा प्रकरणात जवळ-जवळ २० हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी सादर करण्यात आली आहेत, असं ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसंघवी यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यासहीत दाखवून दिलं.”

हेही वाचा : “सगळेच गद्दार, अजित पवार गट ‘खोके-खोके’ म्हणायचे, आता तेच…”, बच्चू कडूंचं मोठं विधान

“फुटीर गटाचे वकील ज्येष्ठ विधीतज्ञ मुकुल रोहतगी यांनी खूप युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, आताच्या क्षणाला याची गरजच नाही. परंतु, निवडणूक आयोगाने ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. अभिषेक मनुसंघवी यांनी भारतीय संविधानाप्रमाणे प्रतिज्ञापत्रावर खोटं बोलणं, हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली,” असंही आव्हाडांनी पुढे नमूद केलं.

“यापुढे काय होईल? हे मला माहीत नाही. पण, हे सगळं खोट आहे, खोट्याच्या आधारावर आहे, हे मात्र आज समोर आलं. जे खोट्याच्या आधारावर वागतात ते शेवटी खोटचं करतात, हे सिद्ध झालं. निवडणूक आयोग काय निकाल देईल? याबद्दल मला फार काही समजून घ्यायची इच्छा नाही. पण, पुराव्यानिशी हे सिद्ध करण्यात आलं की, हे केलेलं सगळं खोट होतं. म्हणजे मी जे म्हणतोय तेच अधर्माविरुद्ध धर्माची लढाई,” असं आव्हाडांनी म्हटलं.

हेही वाचा : “अजित पवार गटाच्या २० हजार प्रतिज्ञापत्रांत त्रुटी”, EC मधील सुनावणी संपल्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांचा दावा

“शरद पवारांची दिशाभूल करणं थांबवा”

याला सूरज चव्हाण यांनी ‘एक्स’ अकाउंटवरूनच प्रत्युत्तर दिलं आहे. “असत्य आणि अधर्म हे तुमचं ब्रीद वाक्य आहे… धर्माची भाषा तुमच्या तोंडून शोभून दिसतं नाही. खोटं बोलावं पण एवढं? २० हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी आहेत हे सिद्ध करावं, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. महाराष्ट्राच्या जनतेची आणि शरद पवारांची दिशाभूल करणं थांबवा,” अशा शब्दांत सूरज चव्हाणांनी आव्हाडांना सुनावलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar group leader suraj chavan reply jitendra awhad tweet over ncp election commission ssa
Show comments