भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून वाद पेटला आहे. पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लांडगा’ केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. पडळकरांविरोधात अजित पवार गटाकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या वादात भाजपा आमदार नितेश राणे यांनी उडी घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
“महाविकास आघाडीचं सरकार असताना संजय राऊत यांचं तोंड बंद का करण्यात आलं नाही? ज्या अर्थी संजय राऊत अजित पवार यांच्यावर टीका करायचे. याचा अर्थ राऊतांना टीका करायला सांगितलं जायचं किंवा सिल्वर ओकची मूक संमती होती. जो न्याय संजय राऊतांना लावला. तोच न्याय पडळकरांना लावावा,” असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं.
“नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर एकाच माळेचे मणी”
याला राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ( अजित पवार गट ) सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर एकाच माळेचे मणी आहेत. टीका करताना आपली भाषा संवैधानिक राहावी. नारायण राणे लघू आणि मध्यम उद्योगात आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकले नाहीत, ही टीका झाली. तर, नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही व्यक्तीगत टीका झाली.”
“त्यामुळे आमच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना त्याच भाषेत, त्याच वेळी समजेल असं उत्तर देण्यात येईल,” असा इशाराही सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
पडळकरांचं वक्तव्य काय?
“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.