मला लोक सांगायचे सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण, पात्रता असताना देखील स्वत:च्या मुलीला बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. “सुप्रिया सुळेंची पात्रता असती, तर आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते,” असं टीकास्र उमेश पाटलांनी डागलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“मला लोक सांगायचे सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून आल्या असून त्यांना संधी द्या. मात्र, पात्रता असताना देखील स्वत:च्या मुलीला बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा सुप्रिया सुळेंना संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?” असं शरद पवारांनी म्हटलं होतं.
“…म्हणून हा गृहदोष निर्माण झाला आहे”
याच विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेश पाटील म्हणाले, “अजित पवारांच्या पाठीशी ५४ पैकी ४३ आमदार आहेत. सुप्रिया सुळेंची पात्रता असती, तर ४३ आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. सिंह कन्या राशीत अनेक वर्षापासून झुकलेला होता. सिंह कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत गेल्यानं हा गृहदोष निर्माण झाला आहे.”
“…ही आमची चूक आहे का?”
दरम्यान, २०२३ साली जुलै महिन्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केलेला. “आजपर्यंत लोकांसमोर मला व्हिलन का केलं जात होतं, हे मला कळलं नाही. शरद पवार माझे श्रद्धास्थान आहेत. पण, आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का?” अशी खदखद अजित पवारांनी व्यक्त केली होती.