अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगात जाऊन आव्हान दिलं आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी निर्णय देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करणारं कॅव्हेट राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलं आहे. याविषयी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने त्यांची बाजू मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, ९५ ते ९९ टक्के आमदारांचं आम्हाला समर्थन आहे. निश्चितपणे सर्व आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी अजित पवार यांच्या निर्णयाबरोबर आहेत.
उमेश पाटील म्हणाले, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. व्हीप हा आमचा आहे आणि तोच सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना लागू होईल. दरम्यान, यावेळी पाटील यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की, तुमच्याबरोबर एकूण किती आमदार आहेत. त्यावर पाटील म्हणाले, अजित पवार यांनी आधीच सांगितलंय आकडा सांगायला तो काही मटका नाही. विधानसभेत सरकारला बहुमत सिद्ध करण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे आकडेवारीवर कशाला चर्चा करता.
हे ही वाचा >> “मीही एक पुस्तक लिहिणार, तेव्हा देशाला…”, प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना इशारा?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या कॅव्हेटबद्दल विचारल्यावर उमेश पाटील म्हणाले, ते कॅव्हेट पवार साहेबांनी दाखल केलेलं नाही. ते कॅव्हेट जितेंद्र आव्हाडांनी दाखल केलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत पडणार नाही असं वक्तव्य पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या परस्पर काहीजण असले उद्योग करत आहेत. तशी परिस्थिती निर्माण झालीच तर न्यायालयीन लढाईला आम्ही समर्थ आहोत.