राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना सुरुवातीला घशाचा त्रास झाला होता, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची अनुपस्थिती होती. काही दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. आता त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. संजय कपोटे यांनी माहिती दिली आहे.
अजित पवारांना पाच दिवसांपासून डेंग्युची लागण झाली आहे. त्यांना १०१ अंश सेल्सिअस इतका ताप असल्याची माहिती डॉ. संजय कपोटे यांनी माध्यमांना दिली. तसंच, त्यांना अंत्यत अशक्तपणा आला असून एक पायरी चढली तरी त्यांना थकवा लागत असल्याचं ते म्हणाले. तसंच, पेशींची कमजोरी आणि इतर अवयव कसे आहेत हे पाहण्यासाठी काही चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करायचे की नाही ठरवले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अजित पवारांवर सध्या घरातच उपचार चालू आहेत. घरात आयसीयूसारखी खोली तयार करण्यात आली असून तिथेत त्यांना सलाईन लावली जात आहे, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. डेंग्यू आजार संसर्गजन्य असल्याने या आजारातून येणारा अशक्तपणा जाण्यास एक महिना लागतो, अशीही माहिती डॉक्टरांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत. परंतु, अजित पवार कुठेच दिसत नसल्याने शंका उपस्थित केली जात होती. परंतु, त्यांना डेंग्युची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार चालू आहेत. त्यामुळे ते सध्या आराम करत असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती लवकरच सुधारणार असून पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात ते येतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.