विधानसभा निवडणुकांसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवघी शिल्लक राहिलेला असताना राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाच्या आमदारांनी मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं. यापूर्वी अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारसभांना सुरुवात करत असल्याचं माध्यमांना सांगितलं. तसेच, सिद्धिविनायक मंदिरात आपण विधानपरिषद निवडणुकीसाठी आलो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले अजित पवार?
मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने अजित पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असल्याचं सांगितलं. “१४ तारखेला आमची पहिली रॅली बारामतीमधून आम्ही सुरू करतोय. विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सरकारने घेतलेले निर्णय, योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चांगल्या कामाची सुरुवात करताना देवाचं दर्शन घेऊन केली जाते. म्हणून आम्ही मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतोय”, असं अजित पवार म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दर्शनाला?
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा दौरा काढलात का? असा प्रश्न केला असता अजित पवारांनी त्यावर उत्तर दिलं. “महाराष्टाचा दौरा विधानपरिषदेच्या निमित्ताने नसून आमचा पक्ष मजबूत करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात आम्ही दौरे करणार आहोत. त्याची ही सुरुवात आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचं हॉटेल पॉलिटिक्स?
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांना यावेळी विचारण केली. आमदारांना सुरक्षित करण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स करणार का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता त्यावर अजित पवारांनी सूचक शब्दांत विधान केलं. “आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू”, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
“प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच प्रयत्न सगळे करत आहेत. महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
सभापतीपदाच्या निवडणुकीचं काय?
विधानपरिषदेच्या सभापती पदाची निवडणूक होणार असून त्यासंदर्भातही अजित पवारांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी विरोधकांच्या भेटीगाठींवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांनी कुणाला भेटावं हा त्यांचा अधिकार आहे. सभापतींची निवड हा सरकारचा प्रश्न आहे. महायुतीचे नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार व त्यांच्या आमदारांनी व्हिक्टरीचं चिन्ह दाखवलं. त्यावर त्यांना प्रश्न विचारला असता “जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकानं आम्हाला आशीर्वाद द्यावेत यासाठी आम्ही व्हिक्टरीची खूण दाखवली आहे. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं”, असं ते म्हणाले.