Ajit Pawar : लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या आधी प्रचंड गाजली. ही योजना निवडणुकीपुरती मर्यादित आहे नंतर बंद केली जाईल, या योजनेचे पैसे मिळणारच नाहीत अशी टीका विरोधकांकडून होत होती. मात्र ही योजना सुरुच राहणार असं सत्ताधाऱ्यांनी तेव्हाही सांगितलं आणि निवडून आल्यानंतरही तेच सांगितलं. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार याबाबत अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे. तसंच लोकसभा निवडणूक निकाल आणि विधानसभा निवडणूक निकालांवरही ते बोलले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अजित पवार?

कधी कधी अपयश येतं पण ते अपयश कायमचं नसतं. विधानसभा निवडणुकीनंतर आमची जबाबदारी वाढली आहे. महायुतीला लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर केवळ १७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता वेगळं चित्र आहे. विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळाल्याचे अजित पवार म्हणाले. कोणतही यश अपयश कायम नसतं आपल्याला यात सातत्य ठिकवायच आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत २१०० रुपये देण्याच आश्वासन

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचं सरकार आल्यानंतर महिलांना २१०० रुपये देण्याचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. तसेच त्यांच्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी हा मुद्दा त्यांनी अंतर्भूत केला होता. महायुतीचं सरकार स्थापन होऊन दीड महिना झाला आहे. मात्र महिलांना २१०० रुपये दरमहा कधी मिळणार? हे विचारलं असता अजित पवार यांनी त्याबाबतही उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Ajit Pawar : “येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिर्डीत महत्वाचं विधान

चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी करणार-अजित पवार

सध्या पक्षात अनेकजण येत आहेत. पक्षाची बेरीज झाली पाहिजे. मात्र, पक्षाला कमीपणा यायला नको. जनमानसांत प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. गैरवर्तणूक होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या. चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल असंही अजित पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार विचारताच अजित पवारांचं उत्तर

लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार? या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.अजित पवार म्हणाले, २६ जानेवारी म्हणजेच पुढच्या रविवारच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील. उद्यापासून विविध विभागांना भेटून आम्ही बैठका घेणार आहोत असंही अजित पवार म्हणाले. तसंच यावेळी होणारा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असेल असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar imp statement about ladki bahin scheme told the date about next installment scj