राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या मिश्किल पण रोखठोक भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या मिश्किल विधानांमुळे काही वेळा ते अडचणीतही आले आहेत. मात्र, अजित पवारांच्या या मिश्किल स्वभावाची नेहमीच चर्चा असते. त्यामुळे अजित पवारांचं भाषण हा नेहमीच उपस्थितांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. बारामतीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात अजित पवारांनी केलेल्या अशाच टोलेबाजीवर उपस्थितांनी दिलखुलास हसत दाद दिली!
बारामतीमध्ये पाण्याची व्यवस्था!
अजित पवारांनी यावेळी बारामतीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात योजनेची माहिती दिली. बारामतीकरांना पाण्याची अखंड सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. “बारामतीला कॅनॉलला क्लोजर जरी आला तरी पाणी कमी पडलं नाही पाहिजे अशी व्यवस्था आपण करतोय. पण म्हणून पलटन वाढवू नका. एक-दोन अपत्यांवरच थांबा. नाहीतर काय अजित पवार देतोय, आहे देवाची कृपा वगैरे. तसं काही करू नका”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. त्यांनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
“…तर आमदार निधी ७ कोटी झाला असता!”
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी आमदार निधी ७ कोटी करणार होतो, असं विधान केलं. “मी म्हणत होतो की मला संधी मिळाली तेव्हा मी आमदार निधी एकचा दोन, दोनचा तीन, तीनचा चार, चारचा पाच कोटी केला. आता हे सरकार गेलं म्हणून. नाहीतर सरकार राहिलं असतं तर टर्म संपेपर्यंत मी सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारांचा आमदार निधी सात कोटींपर्यंत नेणार होतो”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
कोयता गँगबाबत अजित पवारांचे पोलिसांना आदेश
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी कोयता गँगबाबत स्थानिक पोलिसांना आदेश दिले आहेत. “माझी विनंती आहे. मी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सांगतोय. बारामतीमध्ये वेडेवाकडे प्रकार होत आहेत. काल-परवा पिंपरी-चिंचवडमधल्या कोयता गँगच्या क्लिप माझ्याकडे आल्या आहेत. काही मुलं दुकानात आली. दुकानात पाण्याची बाटली मागितली. पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून ५-६ कोयत्यांनी धडाधड त्याच्या दुकानाच्या काचा फोडल्या. त्याबद्दल मी तिथले सीपी, पुण्याचे सीपी यांच्याशी बोलेन. मी या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. रोज माझ्याबरोबर ऊठबस करणारा, जवळ बसणारा जरी चुकीचं वागला तरी तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. काही घाबरायचं कारण नाही. माझे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्हाला आदेश आहेत”, असं अजित पवार म्हणाले.