राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची निर्धार रॅली कर्जत येथे आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार डेंग्यु झाल्यामुळे माध्यमांपासून लांब होते. परंतु, गेल्या दोन तीन दिवसांपासून ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून आज त्यांनी कर्जत येथे जाहीर सभाही झाली. यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेण्यामागचं कारणही विषद केलं.
अजित पवार म्हणाले की, मधल्या काळात काही राजकीय बदल झाले. त्याबाबत बराच उहापोह झाला. सगळ्यांना सांगायचं आहे की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या जिल्ह्यात समुद्रकिनारा आहे. डोंगराळ भाग आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. रेल्वे गेली आहे. रस्त्यांचं जाळं निर्माण झालं आहे. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ व्हावं. अनेक मह्तत्वाच्या भागांना जोडणारं काम होत आहे. पुणे, नगर जिल्ह्यांतून घाटातून येताना लोकांना त्रास होतो. तेथेही काही व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इथल्या लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे.
“आम्ही राजकारणात ३०-३५ वर्षे काम करत आहोत. पर्यटनाला चालना दिली तर सर्वाधिक रोज स्थानिकांना मिळतो. प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. गेल्या साडेनऊ वर्षांत भारताच्या जनतेसाठी योजना जाहीर केल्या आहेत. या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.
“काहीजण विचार करत असतील की ही भूमिका का घेतली? आम्ही साधू संत नाही. अनेक वर्षे अनेक सरकारमध्ये आम्ही काम केलं. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत जातात. परंतु, आपली विचारधारा सोडत नाहीत. या निर्धार सभेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगतो की, आमची विचारधारा स्पष्ट आहे. अल्पसंख्याक, मागासवर्गीय आदिवासी समाज असेल, सर्वसाधारण समाज असेल कोणत्याही समाजाला आपआपल्या समाजात एकोपा राहावा ही भूमिका युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी घेतली होती. आणि स्वराज्याची स्थापना केली. त्याच रस्त्याने आमच्या सगळ्यांच्या जाण्याचा प्रयत्न आहे, असंही अजित पवार म्हणाले.