राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना चालू असताना दुसरीकडे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रजकीय कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर खोचक टीका आणि टोलेबाजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एकाचवेळी सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर टीका केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी लगावलेल्या टोल्याला अजित पवारांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते अजित पवार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर खोचक शब्दांत तोंडसुख घेतलं होतं. “इथे आम्हाला एकाच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळताना नाकी नऊ यायचं. हे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सांभाळणार आहेत”, असं अजित पवार म्हणाले होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी गुरुमंत्र देण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.

“असल्या फालतू…”, अजित पवारांचं अब्दुल सत्तारांवर टीकास्र; ‘त्या’ विधानावरून सुनावलं!

“जिल्हे कसे मॅनेज करायचे त्याचा गुरुमंत्र मी अजित पवारांना नक्कीच देईन”, अशा शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला होता.

“मी फडणवीसांना पत्र पाठवणार आहे”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या टोल्यावर अजित पवारांनी प्रतिटोला लगावला आहे. “मी आता त्यांना पत्र पाठविणार आहे की ट्रेनिंगसाठी केव्हा येऊ? त्या ट्रेनिंगकरता काही फी लागणार आहे का ? की ते मोफत दिलं जाणार आहे? त्याबाबत मी त्यांच्याशी हितगुज करतो. त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.

“त्यांचं ते ठरवतील, जनता पाहात आहे”

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारावरूनही अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले, “कोणाला खुश करायचं आणि कोणाला नाराज ठेवायचं हा त्यांचा अधिकार असून त्यामध्ये आम्ही नाक खुपसण्याचं काम नाही. त्यांच ते ठरवतील. काही महिने तर दोघे जणच सर्व पाहात होते.आता कुठे २० जण झाले. सांगून सांगून आत्ता कुठे त्यांनी पालकमंत्री नेमले आहेत.त्यामुळे त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल,तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करतील.हे सर्व जनता पाहत आहे”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar in pune mocks devendra fadnavis statement guardian minister svk pmw