जयंत पाटील, उदयनराजेंची भूमिका राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची ; सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक
सांगली-सातारा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पुरेसे संख्याबळ असूनही, अजित पवार यांनी निवडलेला उमेदवार आणि त्यातून स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी कडवे आव्हान उभे राहिले आहे. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हेसुद्धा आपल्या भावासाठी तयारीनिशी रिंगणात उतरल्याने या लढतीत चुरस निर्माण झाली आहे.
सांगली-सातारा विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले रासपचे शेखर गोरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सांगलीच्या राजकारणात कदम गटाशी फारसे न जुळणाऱ्या वसंतदादा गटाचे नगरसेवक शेखर माने यांची बंडखोरी हा या सामन्यातील तिसरा अंक आहे. निवडणुकीतील हे तीन उमेदवार असले तरी त्यामागील शक्ती या निराळय़ा आहेत आणि पक्षविरहित राजकारणही निराळे आहे.
या निवडणुकीत कदम आणि गोरे यांच्या उमेदवारी जाहीर होण्यापासूनच ही निवडणूक चर्चेत आली आहे. काँग्रेसमध्ये डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांना उमेदवारी देत असताना मुळात सोनसळच्या कदम घराण्यात असणाऱ्या भाऊबंदकीवर काँग्रेसला मात करावी लागली. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आपले वजन वापरावे लागले. आता ही पतंगराव कदम यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे.
गोरे यांच्या उमेदवारीने अस्वस्थता
गोरे यांच्या उमेदवारीने तर सगळय़ांच्याच भुवया वर गेल्या आहेत. महादेव जानकर यांच्या ‘रासप’ पक्षात असणारे गोरे हे माण मतदारसंघातील. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांनी ‘रासप’तर्फे निवडणूक लढवत काँग्रेस उमेदवारास टक्कर दिली होती. खरे तर राष्ट्रवादीकडून यंदा आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु त्यांना डावलत पक्षाबाहेरील व्यक्तीस पक्षात घेत थेट उमेदवारी देण्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. हा निर्णय पूर्णपणे अजित पवार यांनी घेतल्याने वरवर एकवाक्यता दिसणाऱ्या या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे.
हा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर सुरुवातीस काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तो त्या पक्षाकडे राहिला आहे. आजही या गटातील पक्षनिहाय मतदारांवर नजर टाकली, तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी अत्यंत सोपा असा दिसून येईल, परंतु हे सोपे गणित याच पक्षातील गटातटांमुळे यंदा अवघड बनले आहे. या गटातील राष्ट्रवादीचे मतदार हे अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले आणि जयंत पाटील या तीन गटांत प्रामुख्याने विभागलेले आहेत. या तीन गटांची या निवडणुकीत नेमकी भूमिका कशी राहील यावर या लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. दिलीप पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यावर त्यांनी ‘धनशक्तीच्या प्रभावा’चा उल्लेख करत पक्ष नेतृत्वावर तोफ डागली आहे. ही टीका जयंत पाटलांपेक्षा अजित पवारांवर अधिक होती. उदयनराजे यांच्या गटाने अजून त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवलेली आहे. नाराज जयंत पाटील कुणाच्या पारडय़ात आपले वजन टाकतात हेही पाहावे लागणार आहे.
या गटामध्ये एकूण ५७० मतदार आहेत. या गटातील दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आहे, तर सांगली महापालिकेत काँग्रेसचे बहुमत आहे. अनेक नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. आजच्या घडीला कागदावर तरी राष्ट्रवादीची मते काँग्रेसपेक्षा १३१ ने जास्त आहेत. मात्र ही कागदावरची आकडेवारी प्रत्यक्ष मतदानात तशीच राहील का, हा आज तरी प्रश्न आहे. दुसरीकडे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपनेही आपली या भागातील ताकद वाढल्याचे सांगत त्यांची ८० मते असल्याचा दावा केला आहे. भाजपची ही खरी-खोटी मते कुठे जाणार याचीही सध्या चर्चा आहे. याबाबत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी नुकतेच ‘ही दोन कोल्ह्य़ांमधील लढाई आहे, पण पक्ष सांगेल त्या उमेदवारास भाजपचे मतदार मतदान करतील’ असे वक्तव्य केले आहे. यवतमाळमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप बजोरिया यांनी शिवसेना उमेदवाराकरिता माघार घेतली. त्याची भरपाई सांगलीत शिवसेना राष्ट्रवादीला मदत करून करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे यंदाच्या या निवडणुकीत पक्षीय आकडेवारीपेक्षा आर्थिक गणितेच जास्त महत्त्वाची ठरणार असल्याचे सर्वच जण मान्य करत आहेत. लढतीतील दोन्हीही उमेदवार हे ‘तुल्यबळ’ असल्याने उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच जाहीर आरोप-प्रत्यारोपातून पैशांचा पाऊस पडू लागला आहे.
आपापल्या मतदारांची दोन्ही गटांकडून पूर्वीच ‘बांधणी’ सुरू झाली आहे. मतांचा हा बाजार एका मतामागे १० लाखांपर्यंत पोहचल्याची उघड चर्चा आहे. आपल्या या मतदारांना सहलीच्या नावाखाली सुरक्षित ठिकाणीही हलविण्यात आले आहे. यंदा या बालेकिल्ल्यालाच पडलेल्या अनंत छिद्रांनी राष्ट्रवादी आणि पर्यायाने अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.