सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे अलिकडे तीनवेळा सोलापुरात येऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवारी दिवसभराच्या भेटीसाठी सोलापुरात येत आहेत. यात प्रामुख्याने पक्ष बांधणीसाठी पक्षाच्या शहर व जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन, मेळावे, स्थानिक नेत्यांच्या भेटी, शरद पवार गट व अन्य पक्षातील माजी नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार आणि अजित पवार गट अस्तित्वात आल्यानंतर अजित पवार गट पक्ष बांधणीसाठी सोलापुरात प्रथमच सक्रिय झाला आहे. पक्षाच्या शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर स्वतंत्र कार्यालयेही थाटण्यात आली आहेत. जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ पंखा विहीर परिसरात पक्षाचे जिल्हा कार्यालय तर जुनी गिरणी आवाराजवळील चौकात शहर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होत आहे.
सकाळी ९.३० वाजता लातूर येथून सोलापुरात हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर अजित पवार हे प्रथम ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विकासकामांचा औपचारिक आढावा घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आयोजिलेले सर्व पक्षीय कार्यक्रम आयोजिले आहेत.
रामवाडी परिसरात माजी नगरसेवक किसन जाधव यांनी आयोजिलेले महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या शुभारंभासह अन्य विविध विकास कामांचाही शुभारंभ पवार यांच्या हस्ते होणार आहे. जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात आयोजिलेल्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात त्यांचे मार्गदर्शन होणार असून तत्पूर्वी, जुनी गिरणी आवाराजवळील शहर कार्यालयाच्या उद्घाटनासह आयोजित मेळाव्यात शरद पवार गटाचे बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, किशोर पाटील आदींसह अन्य नेते व कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश घेणार आहेत.
सायंकाळी सात वाजता शासकीय विश्रामगृहात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात शिष्टमंडळासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांनाही अजित पवार भेटणार आहेत. राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाने आयोजिलेल्या ट्रस्टी संवाद कार्यक्रमातही अजित पवार हे सहभागीहोणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे गेली तीन वर्षे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. ते अजित पवार गटाशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे पवार हे चंदनशिवे यांच्या बुधवार पेठेतील निवासस्थानीही भेटीसाठी जाणार आहेत. रात्री ति-हे (ता. उत्तर सोलापूर) येथे माजी आमदार दिलीप माने यांनाही ते भेटणार आहेत. माने हे सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटात असले तरी तेथे सक्रिय नाहीत. आगामी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्याच्या त्यांच्या हालचाली दिसत असताना उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीतून माने हे कोणता राजकीय निर्णय घेणार, याचीही स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.