पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचं बोललं जात आहे. पुण्याच्या कारभारात अजित पवारांकडून हस्तक्षेप होत असल्याने चंद्रकांत पाटलांनी ही तक्रार केल्याचं समजत आहे. पुणे शहराच्या कारभाराची सूत्रे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे असली, तरी अजित पवार यांनी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करून बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित बैठकांना पालकमंत्री म्हणून पाटील यांना निमंत्रित करण्यात येते. मात्र, बैठकीच्या केंद्रस्थानी पवार हेच असतात. तसेच बैठकांमध्ये निर्णय जाहीर करण्याचेही सोपस्कारही पवार हेच पार पाडतात. त्यामुळे पाटील हे नाममात्र पालकमंत्र्यांच्या भूमिकेत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर शिंदे गटाचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन”, शिंदे गटाच्या आमदाराचं विधान चर्चेत

“चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ काय बोलले? हे मला माहीत नाही. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. परंतु, असं समन्वय नसल्याचं वातावरण महाराष्ट्रात कुठेही नाही. सगळे नेते महाराष्ट्रात चांगल्याप्रकारे समाजकारण आणि राजकारण करणारे आहेत. त्यामुळे सगळ्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही,” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “त्यांना कसं संपवायचं, हे…”, नितीन गडकरींविरुद्धच्या कथित कटाबद्दल संजय राऊतांचं विधान

उदय सामंत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री आहे. प्रत्येकाकडे दोन-तीन जिल्हे आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे एक-एक जिल्हा द्यावा, अशी महायुतीतील चर्चा असू शकते. परंतु एखाद्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाहीत, असं स्थिती कुठेही नाही. फक्त जेवढे जिल्हे आहेत, तेवढी मंत्र्यांची संख्या नसल्याने काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar intervention in pune politics chandrakant patil complaint to cm eknath shinde uday samant reaction rmm